Blog

पुर्वी जेव्हा स्मार्ट फोन नव्हते, तेव्हा फोटो काढायचा म्हटलं तर कॅमेरा हे एकमेव साधन असायचं. आणि ते देखील हल्ली च्या कॅमेरा सारखे नाहीत,त्यात रोल्स,निगेटीव्हस अस सगळं असायचं.आणि मग त्याची प्रिंट काढल्यावर फोटो मिळायचा. तेव्हा कधीतरीच फोटो काढत असल्याने त्याचं फार अप्रुप वाटायचं. आणि मग स्टुडिओत गेल्यावर पोज देऊन तयार झालो की फोटो क्लिक करण्यापुर्वी ते फोटोग्राफर दादा एक पेटंट वाक्य बोलायचे, स्माईल प्लीज…?! आणि सुंदर हसु उमटलेला एक गोड फोटो, एक गोंडस आठवण निर्माण व्हायची.आता

काळ बदलला तशी कॅमेराची जागा मोबाईल च्या कॅमेराने घेतली. पुर्वी जे फक्त सण, समारंभाचे,काही निवडक सोहळ्याचे,क्षणांचे फोटो काढले जायचे ते आता सहज,सुलभ झाले.आणि हल्ली तर त्याचा अतिरेक झालाय,असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी व्यायाम,जेवण,झोप, हॉटेलींग, शॉपिंग इ. काहीच फोटो शिवाय केलं जात नाही. पण या सुलभ झालेल्या फोटोग्राफीत एक गोष्ट मात्र दुर्लक्षित झाली. ती म्हणजे मनातुन,आतुन आलेली ती स्माईल..ते हसु..!

पुर्वी हसायला,आनंदी राहायला निमित्त लागायचं नाही. सगळे तो आनंद अनुभवण्यात एवढे मश्गुल असायचे की तो आनंद कॅमेरात कैद करायचा म्हणजे अवघडल्या सारखं व्हायचं. म्हणुन कॅमेरामन दादांना “स्माईल प्लीज” म्हणावं लागायचं. पण त्यावेळी हसायला टॅक्स लागत नव्हता.आता मात्र फोटो कितीही ढिम्म आला,निर्विकार आला तरी चालतो. हल्ली तर स्टाईल म्हणुन एकदम असे तीक्ष्ण हावभाव करुन, ज्यात हा रागात आहे? का कुणाला रोखून बघतोय? हे ही उमगत नाही बघणारयाला,असे फोटो काढले जातात. पण हसायला मात्र भुरदंड पडतो बहुदा.

रस्त्यात कुणी परिचीत दिसला, तर बरेच लोक एकटक बघत जातील. पण एक साधं स्माईल देणार नाही. आता बरयाच मंडळींना वाटत असेल उगाच कुणाकडे बघुन दात काढायला आम्हाला काय वेड लागलंय? तर वेड नाही,पण हसण्याचा छंद लाऊन घ्यायला काय हरकत आहे! आपल्या एका स्माईल ने आपला तो क्षण आणि समोरच्याचा अख्खा दिवस छान जाऊ शकतो. कारण हसु हे सांसर्गिक असतं म्हणतात.

तशी जादुच असते हसण्यात. विश्वास नसेल, तर प्रयोग करुन बघा. आत्ता आरश्यात स्वत:ला एक छानस स्माईल द्या,बघा केवढं प्रसन्न वाटतं.कुणाकडे तरी रागात किंवा मठ्ठ चेहरयानी एकटक बघीतल्याने आपण समोरच्याच्या जेवढं लक्षात राहतो. त्याहुन कित्येक पटीने आपल्या एका स्माईल ने आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात जागा निर्माण करू शकतो. एवढा साधा,सोपा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे ?

चला तर मग,आपणच आपले फोटोग्राफर दादा होऊन स्वतःला “स्माईल प्लीज” म्हणुया..आणि स्माईल स्प्रेड करूया.स्माईल प्लीज…?!